नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील स्वामीनगर भागात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदिप गौतम नरवाडे (रा.वाघ चाळ,स्वामीनगर अंबड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नरवाडे यांनी गुरूवारी (दि.२५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पत्नी मनिषा नरवाडे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रानी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना स्वामी विवेकानंद नगर भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या बाळासाहेब म्हसे (रा.शिवाजीनगर म्हसरूळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
म्हसे बुधवारी (दि.२४) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. घर परिसरातील मारोती सुपर मार्र्केट जवळून त्या रस्त्याने पायी जात असतांना पल्सर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे मिनी गंठण हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक मद्रुपर करीत आहेत.