इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आरक्षणावरून पहिल्यांदाच मनोज जरांगे यांनी ठाकरे, पवार, पटोलेंकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी या प्रमुख नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. याबाबत निर्णय न झाल्यास येत्या २९ ऑगस्टला मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले, की सरकारशी बोलणे झाले नाही. पाऊस सुरू असल्याने सरकार व्यस्त आहेत. जनता अडचणीत असताना सरकारला त्रास देणे योग्य नाही. मराठा समाजाला मोठे करायचे असेल, तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही, तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकील. सरकारकडून हा विषय विरोधकांवर ढकलला जात आहे. विरोधक नाही म्हणाले तर सरकार आरक्षण देणार नाही का? एकमेकांवर ढकलणे बंद करावे
यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही, यावर पवार, ठाकरे, पटोले यांनी भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे, तसेच विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने त्यांची वाट बघू नये. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेतला, तर मराठा समाज सरकारला डोक्यावर घेईल, असे जरांगे यांनी सांगितले. महाविकास आघाडी किंवा महायुतीचे आम्ही विरोधक नाहीत. सत्याच्या बाजूने आम्ही आहोत.
आम्हाला राजकारणामध्ये पडायचे नाही, याचा पुनरुच्चार करताना आरक्षण मिळाले नाही, तर नाइलाजाने कुणाला पाडायचे, याचा निर्णय आम्ही घेऊ. १४ ते २० ऑगस्टपर्यंत उमेदवारांची यादी करू. २० ते २७ ऑगस्टला या यादीवर चर्चा करू आणि २९ ऑगस्ट रोजी काय करायचे ते ठरवू, प्लॅनच त्यांनी सांगितला.