मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख व श्याम मानव यांनी केलेल्या आरोपावर बोलले परिणाम झाल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात. त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. मला असं वाटतं इको सिस्टममध्ये आता सुपारीबाज लोकं घुसले आहे. सुपारी घेऊन बोलणारे लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का. एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकासआघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.’
ते पुढे म्हणाले की, ‘मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिजवल मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे, वाझेवर काय बोलताय ते सगळं माझ्या कडे आहे. माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करेल. रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे मी पुराव्य़ा शिवाय काहीही बोलत नाही.
श्याम मानव यांनी केले होते हे आरोप
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चौघांना खोट्या प्रकरणांत तुरुंगात डांबण्याचा डाव होता; परंतु तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधीच्या एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघे वाचले. नंतर या प्रकरणांत देशमुखांवरच तुरुंगात जाण्याची वेळ आली, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, देशमुख यांना प्रतिज्ञापत्र पाठवणारे नेते कोण? अशी चर्चा सुरू झाली होती.
देशमुख यांनी दावा खरा असल्याचे सांगितले
देशमुख यांनी श्याम मानव यांनी केलेला दावा खरा असल्याचे सांगताना त्यांनी या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आपल्याकडे पुरावे असल्याचेही ते म्हणाले. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप करण्यास मला सांगण्यात आले होते. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या माध्यमातून कारवाई करण्यात आली असून फडणवीस यांनी त्यांच्या जवळचा एक माणूस माझ्याकडे पाठवला होता. या व्यक्तीने माझे अनेकदा फडणवीस यांच्यांशी बोलणे करून दिले होते, असा आरोप देशमुख यांनी केला.