इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुरबार जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दूध भेसळ नियंत्रण समिती स्थापन केलेली असून या समितीमार्फत नुकतेच जिल्ह्यातील विविध भागात दुधाची तपासणी करुन १०१ लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले असल्याची माहिती सदस्य सचिव दूध भेसळ प्रतिबंध समिती तथा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सदर समितीची कारवाई अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष धनंजय गोगटे, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मनोज पावरा नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यावेळी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित रमेश पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन डी. डी. तांबोळी, क्षेत्रसहाय्यक वैध मापनशास्त्र एस. वी. सोनवणे, विस्तार संकलन प्रितेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, विजय भदाणे तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नंदुरबार शहरी भागातील देसाईपुरा, राजपुत पेट्रोल पंप, कोकणी हिल, संजय नगर, अंधारे स्टॉप इत्यादी परिसरात दूध विक्री संकलन करुन विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले ठेलावाले यांच्याकडील दूधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाव्दारे करण्यात आली. या कारवाईमध्ये एकुण ९ दूध विक्रेत्यांच्या एकूण सरासरी ४१९ लिटर दूधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची तपासणी करुन ४ दूध विक्रेत्याच्या दूध साठ्यांमध्ये पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास, चव, कचरा, अस्वच्छता आढळुन आली. यामध्ये ९ लिटर गाईचे व ९२ लिटर म्हशीचे असे एकूण १०१ लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले.
यावेळी वैध मापनशास्त्र विभाग, धुळे यांच्यासोबत संयुक्त पथकाव्दारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र- यांच्या मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली. त्यातील २ दूध विक्रेत्यांच्या डेअरीतील, वापरातील वजन मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन आढळुन आल्याने वैध मापनशास्त्र अधिनियमअंतर्गत खटले नोंदविण्यांत आले आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन ‘विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यांत २ दूध नमुने व ४ स्विट्स नमुने तपासणीसाठी घेण्यांत आले आहे.
जिल्ह्यातील दूध विक्रेते व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणे व भेसळ नियंत्रण मोहिमेस मज्जाव करणे हा कायद्याने गुन्हा असून दूध पुरवठादार व दूध विक्रेत्यांनी पाणी किंवा कुठल्याही प्रकारची भेसळ न करता, स्वच्छ दूध हाताळणी व स्वच्छ कार्यपध्दतींचा अवलंब करून विनाभेसळ दूध वाहतुक व वितरण करावे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य खाद्यपदार्थामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधात भविष्यात दंडनीय व कायदेशीर करवाई करण्यांत येईल. तसेच दूध भेसळ प्रतिबंध समितीच्या कार्यवाहीस अटकाव, अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनेविरोधात कठोर कारवाई करण्यांत येईल, असेही प्रसिद्धीपत्रकानुसार श्री. पाटील यांनी कळविले आहे.