इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – निवडणुका कोणत्याही असो त्या जिंकण्यासाठी समोरचा उमेदवार कसोशीने प्रयत्न करतो. त्यामुळे दादागिरी असो की पैशाचा वापर हे निवडणुकीत नेहमी होत असते. पण, निवडणूक जिंकण्यासाठी थेट जादूटोणाचा आधार घेण्याचा प्रकार मात्र धक्कादायक आहे. पुणे जिल्हयातील नारायणगाव येथे सुरु असलेल्या ग्रामपंचायात निवडणुकीत हा प्रकार समोर आला व त्याची आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. या गावात निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवासाठी चक्क जादूटोण्याचा आधार घेतला आहे.
नारायणगाव ही पुणे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. शहराइतक्या लोकसंख्येच्या या गावात अजूनही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. निवडणुकीतला प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला. त्यानंतर उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर लिंबू आणि टाचण्या टोचल्याचा प्रकार उघड झाला आहे. नारायणगावातील भर वस्तीत फोटोसह लिंबू टाचण्या आढळल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अलीकडच्या काळात तरुणांचे प्रमाण वाढले आहे. उच्चशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जायला हवी; परंतु विकासकामांऐवजी विजयासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आता पुढे आली आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीत १७ जागा आहेत. एकूण सहा प्रभागातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सरपंचपदासाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.