इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्लामाबादः पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला झाल्यामुळे पाकीस्तान हादरला आहे. हे दहशतवादी शस्त्रास्त्रांसह मियांवली एअरबेसमध्ये घुसले आहेत. पाकिस्तानी पोलिस दलाचे सैनिकही प्रत्युत्तर देत आहेत. दहशतवाद्यांनी तीन लढाऊ विमाने जाळली आहेत. त्याचवेळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनेक जण अजूनही वेढलेले आहेत.
पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर शनिवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला. मियांवलीतील पीएएफ तळावर जोरदार गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अनेक आत्मघाती बॉम्बर्ससह जोरदार सशस्त्र जिहादींनी पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर हल्ला केला आहे. या घटनेचे काही व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहेत. त्यात जोरदार गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहे. ‘तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आजच पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात लष्करी कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून दोन दहशतवादी मारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कराने ही माहिती दिली.
पाकिस्तानी लष्कराची ‘मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ (आयएसपीआर) ने सांगितले, की प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील रोरी भागात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईदरम्यान एक दहशतवादी ठार झाला आणि दोन जण जखमी झाले. मारला गेलेला दहशतवादी बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’शी (टीटीपी) संबंधित होता आणि या भागात हाय-प्रोफाइल घटना घडवण्याची योजना आखत होता, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या लष्करी कारवाईदरम्यान, डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची भागात शक्तिशाली स्फोटक यंत्राच्या (आयईडी) स्फोटात एका सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. तिसरी कारवाई लक्की मारवत जिल्ह्यात सुरू करण्यात आली. तिथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान ठार झाले आणि एक दहशतवादी मारला गेला.
शुक्रवारी, पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दोन वाहनांवर हल्ला केला. त्यात किमान १४ सैनिक ठार झाले. बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी झालेला दहशतवादी हल्ला या वर्षातील सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे सर्वाधिक सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, सैनिकांची दोन वाहने पासनीहून ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा भागात जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.