नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय नौदलात नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून एकास तीन लाखाला गंडा घातला आहे. मुंबईस्थीत बंटी बबलीने ही फसवणूक केली आहे. पाच वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने तसेच संशयितानी पैसे परत न करताच गाशा गुंडाळल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशान्वये याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वकर्मा अरविंद हिरालाल (३०) व ज्योती गांगुर्डे (२६ रा.दोघे गुरूकृपा अपा.रामनगर,आडगाव हल्ली सीबीडी बेलापूर नवी मुंबई ) अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत कमलेश बालजीभाई पटेल (५३ रा.प्रमेध अपा.कल्पतरूनगर अशोकामार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित ठकबाजांनी भारतीय नौदलात ओळखी असल्याची बतावणी करीत पटेल यांच्या मुलास नोकरीस लावण्याचे आमिष दाखविले होते. हा प्रकार सन. २०१९ मध्ये घडला होता.
यावेळी खोटे दस्त दाखविण्यात आल्याने पटेल यांचा विश्वास बसताच संशयितांनी काही पैसे भरावे लागतील असे सांगीतले. त्यानुसार पटेल यांनी तीन लाखाची रोकड संशयितांकडे सुपूर्द केली होती. मात्र पाच वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. त्यामुळे पटेल यांनी पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयितांनी मुंबईत गाशा गुंडाळला. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पटेल यांनी पोलीसात धाव घेतली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने हा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.