इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे पोलिसांनी रायगड़ जिल्हयातून वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. पण, कोर्टाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली.
खेडकर या रायगड जिल्ह्यातील हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमध्ये लपून बसल्या होत्या. येथे पोलिसांनी त्यांना अटक केली. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या.
मनोरमा खेडकर यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर्षभरापूर्वी खेडकर कुटुंबाने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात २५ एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते.