नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बजरंगवाडीतील तुलसी आय हॉस्पिटल भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. पाच हजाराच्या रोकडसह वेगवेगळया साहित्याचा आणि चांदीच्या अलंकाराचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकूंद मधुकर कुलकर्णी (रा.गायखेनगर,ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. कुलकर्णी यांचे रामेश्वर शिवमंदिर परिसरातील इडन गार्डन सोसायटीत बंगला आहे. या बंगल्याचे गुरूवारी (दि.११) रात्री अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून रोकड व चांदीच्या वस्तू तसेच संसारोपयोगी वस्तू असा सुमारे ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार रोहिदास सोनार करीत आहेत.
हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई केलेली असतांना पूर्व परवानगी न घेता राजरोसपणे शहरात वावरणा-या दोघा तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई बजरंगवाडी येथील महादेव मंदिर भागात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल अशोक ब्राम्हणे (२१) व नवाज हसन खान (२२ रा. दोघे महादेव मंदिराजवळ,बजरंगवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. ब्राम्हणे व खान यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीसांनी त्यांच्या विरोधात अनुक्रमे दोन व एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर आणि जिह्यातून दोघांना तडिपार करण्यात आलेले असतांना त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१५) दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई मुंबईनाका पोलीस आणि शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी अंमलदार समीर शेख व युनिट एक चे कर्मचारी आप्पा पानवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास जमादार सोनार व हवालदार टेमगर करीत आहेत.