इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूर – जल जीवन मिशन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय संपूर्ण राजस्थानमध्ये २५ ठिकाणी शोध घेत आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यांमध्ये ईडीचे पथक सुबोध अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या घरी पोहोचले आहे. ईडीच्या छाप्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये घबराट पसरली आहे. सुबोध अग्रवाल हे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्याचबरोबर ईडीचा प्रभाव पीएचईडी मंत्री महेश जोशी यांच्यापर्यंतही पोहोचू शकतो.
ईडीचे पथक अतिरिक सचिवाच्या निवासस्थान आणि कार्यालयासह २० ठिकाणी पोहोचले आहे. त्याचवेळी केडी गुप्ता, मुख्य अभियंता, दिनेश गोयल, अभियंता आणि प्रॉपर्टी डीलर रामकरण शर्मा यांच्या जयपूरच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत. ईडीच्या छाप्याचे वृत्त समजताच विभागीय अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये घबराट पसरली आहे. ईडीचे पथक सचिवालयात पोहोचले असून विभागाच्या कार्यालयात झडती घेण्यात येत आहे. यापूर्वीही ईडीने पाणीपुरवठा विभागाशी संबंधित अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांची झडती घेतली होती. या प्रकरणी सुबोध अग्रवाल यांना लवकरच अटक होऊ शकते.
राजस्थानमधील जल जीवन मिशनबाबत ईडीने वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडी दौसा येथील व्यापारी नमन रावत यांच्या घरी पोहोचली. ईडी पोहोचताच घर पूर्णपणे बंद झाले आणि व्यावसायिकाचे दुकानही उघडले नाही. त्यामुळे या छाप्याची जोरदार चर्चा झाली.