मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत आता कोणत्याही अटी, शर्थी नाहीत…आमच्या शेतकऱ्यांना १ पैसाही वीजेचे बिल द्यावे लागणार नाही… तर जुने बिल ही वसूल केले जाणार नाही असे सांगत विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २०० जागा निवडून येऊ शकतात, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात केला.
शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज षण्मुखानंद सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचं गणितच समजून सांगितलं. नुकतीच लोकसभा पार पडली. राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेत मविआ म्हणते आमचा विजय झाला. मविआ २ लाख अतिरिक्त मतांमुळे ३० जागा जिंकली. आपण निर्धार केला आणि किमान २० लाख मते जास्त घेतली तर आपल्या २०० जागा येतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटं बोलत होते. मात्र आपणही गाफील राहिलो, अशी कबुली देतानाच फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सत्य चिरकाल जिवंत राहतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल. दुसरी नाही. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागलीय. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही माहीत नाही, असा टोला लगावतानाच आपण सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो अन् ते सकाळी येऊन काही तरी वेडंवाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील, आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेलं. लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.