इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज षण्मुखानंद सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी एकजुटीने काम करून पुन्हा राज्यात सत्ता आणू असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले.
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ, माजी खासदार भावना गवळी तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हा, तालुका, गावातील घरोघरी पोहोचवल्या तर आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे.
राज्य सरकारने दोन वर्षात १३० सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिल्या. मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून गरजूंना २५० कोटींची मदत दिली. अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून १५०० रुपये दरमहा दिले जाणार आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील. महायुती सरकारच्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा असे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.