रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने’चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक तर रायगड जिल्ह्यातील दहा लाखाहुन अधिक महिलांना या योजनेचा मिळणार आहे. शेवटच्या घटकातील माता-भगिनीं पर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नोंदणी शिबिराचा शुभारंभ मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड , माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका माया पकोले, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, माणगाव नगरपंचायतीचे मुख्यधिकारी सांतोष माळी, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी दिलीपकुमार उपाध्ये ,महसूल, जिल्हा परिषद व महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या , राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणी करणाऱ्या महिलांसाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले आहे, त्याचा आज शुभारंभ आहे. अडचणी दूर करण्यासाठी व ‘मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने’साठी बँकांना देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन यादृष्टीने अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत .
त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजना लाभार्थी असणाऱ्या महिलांकरिता बहुजन समाजातील माता-भगिनींसाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हि योजना २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लागू आहे. नोंदणीत अडीअडचणी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही कागदपत्रांच्या बाबतीत लाभार्थी महिलांना शिथिलता दिली आहे असे महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
याप्रसंगी महिलांचा मेळावा घेऊन मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. माझी बहिण लाडकी नोंदणी शिबिराचे उद्घाटनासह महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) रायगड जिल्हा बचतगट यांच्याकडून शिलाई केलेल्या शालेय गणवेशाचे विध्यार्थ्यांना वाटप व माविम तसेच उमेद महिला बचतगटांना बँक कर्ज धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अपूर्वा जंगम व शिक्षक हेमंत बारटक्के यांनी केले . यावेळी माणगाव माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेवक सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे,माजी नरगरसेवक नितीन वाढवळ,माजी नरगरसेवक जयंत बोडेरे, देविका पाबेकर, सौरभ खैरे, सुमित काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह हजारोंच्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेतील माणगाव तालुक्यातील शिबिराचे नियोजन करुन त्याअनुषंगाने दिनांक ६ ते दि. ८ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत महसूल मंडळनिहाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.