नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून गोंदे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गावर मार्गिका तसेच व्हेईकल अंडरपासचे काम सुरू आहे. काम करणाऱ्या संबंधित एजन्सीने योग्य ते नियोजन न केल्याने काही दिवसांपासून महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे.प्रवासास दुप्पटहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाच्या वातावरण निर्माण झाले आहे. वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी तातडीने विशेष उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीचे पत्र माजी खा. हेमंत गोडसे यांनी केद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांना पाठवले आहे.
गोंदे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने तसेच अंडरपासच्या कामामुळे काही महिन्यांपासून वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. या विषयाच्या अनेक तक्रारी माजी खा.गोडसे यांच्याकडे आल्या होत्या.यातूनच आज गोडसे यांनी ना.गडकरी यांना विशेष पत्र पाठवले आहे.याबरोबरच खा.गोडसे यांनी नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर भाऊसाहेब साळुंखे यांचीही भेट घेतली.प्रशासकीय यत्रंणा, ठेकेदार एजन्सी आणि वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे महामार्गाची कोंडी होत असल्याचे गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
वाहनचालक आणि प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी गोडसे यांनी ना.गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात वडपे ते गोंदे महामार्गाच्या दरम्यान रस्त्यावरील चारही लेनवरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे,खड्डे बुजवितांनी एका वेळेस एकाच लेन वरील खड्डे बुजवावे, व्हेईकल अंडरपास उभारणीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ट्राफिक वार्डन तात्काळ नेमणूक करावी,ज्या ठिकाणी व्हेईकल अंडरपाचे काम सुरू झालेले नसेल त्या ठिकाणी आधी सर्विसरोडचे काम पूर्ण करावे ,अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग शोधावा किंवा अवजड वाहनांच्या वेळेचे उत्तम नियोजन करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.गोडसे यांनी आज नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंखे यांची भेट घेऊन त्यांना वरील मागण्यांविषयीचे निवेदन दिले.