नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विविध मागण्यांबाबत काढण्यात आलेल्या एकदिवसीय बंद आणि मोर्चास वाहतूकदरांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा कडून नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत पुढील आठवड्यात बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वासित केले आहे. तसेच उद्योग मंत्र्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेत सोमवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, सेक्रेटरी शंकर धनावडे,श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक, अजय बागुल, मामा राजवाडे, प्रवासी वाहतूक संघटना किशोर लोखंडे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस अंजू सिंगल, चालक-मालक मोटर संघटना सचिन जाधव, रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर भाई, ट्रान्सपोर्ट संघटनेचे रामभाऊ सूर्यवंशी, हर नारायण अग्रवाल, ईदरपालसिंग चड्डा, संजय तोडी, विशाल पाठक बजरंग शर्मा महेंद्रसिंग राजपूत हनुमंत बेनिवाल शक्ती सिंग अवतार सिंग जी सदाशिव पवार, दलजित सिंग मेहता,संजय राठी,जे पि इनदोरिया यांच्यासह सुमारे आठशे हून अधिक वाहतूकदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक ही नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था आहे. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा तसेच वाहतूकदार, चालक यांना औद्योगिक वसाहतीत तसेच महापालिका हद्दीत ट्रक टर्मिनल मध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि परिवाहन विभागात वाहतूक दारांना होत असलेला त्रास कमी व्हावा व राज्याच्या चेक पोस्ट (बॉर्डर) वरील भ्रष्टाचार थांबवण्या साठी इतर राज्यांप्रमाणे चेक पोस्ट बंद करण्यात याव्या यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे चालक व वाहतूकदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या…..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलचे आरक्षण बदलून या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो करत असून तो त्वरित स्थालांतरित करावा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल मध्ये सारथी सुविधा पार्क व मध्य प्रदेशातील इंदोर सारखे मॉडेल तयार करून रस्ते,ड्रेनेज,संरक्षण भिंत, चालकाणसाठी विश्रांतीगृह, उपहारगृह, ट्रेनिंग सेंटर, नशा मुक्ती केंद्र, प्रथमपाचार, ग्रीन जिम, स्पेअर पार्ट शॉप, गॅरेज, ट्रान्सपोर्ट व्यवसाईकांसाठी शॉप, गोडाऊन व ड्रायव्हिंग स्कुल इत्यादी व्यवस्था कराव्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल मध्ये सुरु करण्यात आलेले श्वान निर्बीजिकरन त्वरित बंद करावे.
शहराच्या चारही दिशाना बंद पडलेले जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून विकसित करावे.
शहरातील वेगवेगळे टेम्पो स्टॅन्ड आहे त्यांना त्याच जागेवर कायम करावे.
परिवहन विभाग नाशिक RTO येथे जुन्या गाड्या पासिंग करते वेळी जाचक अटी शिथिल कराव्यात.
राज्यांतर्गत माहाराष्ट्र बॉर्डर (चेक पोस्ट) त्वरित बंद करावे.
नाशिक शहरातील द्वारका सर्कल विकसित करून फेम थियटर सिग्नल वरून इंदिरानगर व टाकळी कडे जाणारी अवजड वाहतूक द्वारका वरून चालु करावी.
तसेच संघटनेच्या वतीने या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त नाशिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक, प्रादेशिक परिवहन अधिकारी,नाशिक,प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी,सातपूर, कार्यकारी अभियंता,एमआयडीसी,सातूपर नाशिक यांना देखील निवेदन दिले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून आंदोलनाची दखल
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये केलेल्या कामबंद आंदोलनाबाबत नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी दखल घेत अधिवेशनाच्या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा करत त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर या आंदोलनाची उद्योग मंत्र्यांनी दखल घेत सोमवारी मुंबईत उद्योग मंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
‘सारथी सुविधा केंद्र हवे
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. संघटनेच्या वतीने नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतीसह शहराच्या चारही बाजूना ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येऊन येथे इंदोरच्या धर्तीवर ‘सारथी सुविधा केंद्र’ निर्माण करण्याची आमची मागणी आहे.
राजेंद्र फड,अध्यक्ष,नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन.