नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत चैनस्नॅचरांनी धुमाकूळ सुरूच असून शनिवारी (दि.२९) वेगवेगळय़ा भागात भामट्यांनी महिलांचे सौभाग्य ओरबाडून नेले. या घटनेत सुमारे ५७ हजाराच्या सोन्याच्या दागिण्यावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एकत्रीत जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता संजय सोनवणे (रा. परिवर्तन चौक,साईबाबानगर,सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनवणे या शनिवारी भाचा ज्ञानेश्वर निकुंभ यांच्या घरी घरभरणीच्या कार्यक्रमा निमित्त बडदेनगर भागात गेल्या होत्या. रात्री कार्यक्रम आटोपून त्या आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. सावरकर चौकातील पांगरेनगर बोर्डाजवळ समोरून येणा-या दुचाकीवरील भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेली.
दुसरी घटना शिवपुरी चौकात घडली. योगीता हेमंत खिस्ते (रा.शिवपुरी चौक,सिडको) या जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. दोन्ही घटनेत सुमारे ५७ हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रांवर भामट्यांनी डल्ला मारला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.