इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओचा १२५ कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
अंधेरी आरटीओने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे ७६ हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत. अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे येथे घटलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत. दोन दुचाकींवर ४१ हजार ९३ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर ३५ हजार २६१ ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.
माणसं मेली तरी आरटीओना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.