बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपण कशाप्रकारे मदत केली, असा संवाद असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात धमकीवजा वक्तव्य केल्याने चर्चेत आलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही माहिती दिली आहे.
दोन दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची असून तीत म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडे यांना मुद्दाम मताधिक्य दिल्याचा उल्लेख आहे. ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो, हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बूथवर सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली, असे ते सांगत आहे. तर धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची कबुली त्यात दिली आहे.
खाडे यांना अटक
खाडे यांना अटक करण्यात आली असून ती एका वेगळ्याच प्रकरणात झाली आहे. दोन महिन्यापूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात कुंडलिक खांडे यांना आता पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याअगोदर धनंजय मुंडे आणि त्यांच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला करण्याची धमकी दिल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे.