नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : प्रेम, वैफल्य, सामाजिक वास्तव, जगण्यातील अस्थिरता, पावसाचा अनियमितपणा, दुष्कशल अशा विविधांगी वेध घेणार्या गझलांचे सादरीकरण ‘गझल विश्वास’ मध्ये झाले. मानवी मनाचे कंगोरे, त्याचे जगणे याचेही प्रतिबिंब गझलांमध्ये होते. विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गझल विश्वास’चे आयोजन करण्यात आले होते. गझल विश्वासचे हे 17वे पुष्प होते. विश्वास हब येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
अविनाश काठवटे यांनी प्रेम करणारा कवी आणि त्याचा आशय म्हणजे जीवन यावर उपरोधिक भाष्य केले.
‘कवी प्रेमात पडलेला नसावा एवढा सुद्धा
कवी प्रेमात पडल्यावर कवी लिहिणार कोणावर?’
अरूण गवळी यांनी पाऊस व तिच्यातले अंतर यांचा लेखा-जोखा मांडला.
‘अंदाज पावसाचे बांधू खुशाल नंतर
आधी कमी करू चल माझ्या तुझ्यात अंतर’
सोमनाथ एखंडे यांनी दुनियेची तर्हा व सामान्य माणूस म्हणून आलेल्या अनुभवांचे विचार मांडले.
दुनिया मायाजाळ मंडळी,
मी तर भोळा बाळ मंडळी
सुप्रिया पुरोहित हळबे यांनी त्यांच्या भेटीनंतरचे मनाला हिरवेपण आणि आयुष्याला गवसलेला अर्थ मांडला.
भेटल्यावर पालवी फुटली मनाला
स्पर्श हिरवेगार नंतर होत गेले
कुणाल शिरूडे यांनी घर बांधताना आई-वडिलांचे कष्ट याची जाणीव मांडली.
आई-बाबा रडले घर बांधत असताना
त्यांना आल्या त्यांच्या कष्टाच्या आठवणी
डॉ. तेजस्विनी कदम यांनी आजच्या वास्तवाचे, जगण्याची परिभाषा नेमकेपणाने मांडली.
तारण्याची मारण्याची पद्धती आली आता,
राजकारण भोवणार ना कुणा सांगायचे
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संजय गोरडे यांनी केले तर गझलकारांचा सन्मान विनायक रानडे यांनी केला. मैफिलीचे सुत्रसंचलन कुणाल शिरूडे यांनी केले. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची संकल्पना असून आयोजक विनायक रानडे व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर आहेत तर समन्वयक संजय गोरडे आहेत.
सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले.