नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विरोधी पक्षनेते राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांना आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याअगोदर शरद पवार हे या वारीत सामील होणार आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे नाव आले आहे.
जगभरात पंढरीची वारी म्हणून प्रसिद्ध असणारा सोहळा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर राहुल या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. राहुल यांनी यापूर्वी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायपीट केली असल्याने पंढरीच्या वारीत पायी चालणे त्यांना फार अवघड नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंढरीच्या वारीत राहुल सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी व जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबलही उंचावेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच वारीत पायी चालण्याचे मान्य केले आहे.
आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबवला जातो. त्यात साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत आदी सहभागी होतात. पवार यांनीही यंदा बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल १७ किलोमीटरचे अंतर पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे.