नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रिक्षाप्रवासात ६० वर्षीय वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी हातोहात लांबविली. ही घटना मेहर सिग्नल ते आनंदवली दरम्यान घडली. या घटनेत ४० हजार रूपये किमतीच्या पोतीवर चोरट्या महिलांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन शिवनाथ आगवान (रा.चांदशी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. आगवान सोमवारी (दि.२४) आपल्या पतीसमवेत रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. आनंदवली येथे जाण्यासाठी आगवान दांम्पत्य मेहर सिग्नल येथे रिक्षात बसले होते. या रिक्षात आगवान दांम्पत्य बसण्यापूर्वीच तीन महिला प्रवास करीत होत्या. प्रवासात सदर महिलांपैकी कुणी तरी आगवान यांच्या गळय़ातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची पोत हातोहात लांबविली असून अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.