नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर डी सर्कलजवळील दुभाजक हटविण्याचे बंद पडलेले काम पूर्ण करून जुने सिडकोला जोडणारा रस्ता त्वरित खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका आयुक्तांना याबाबतचे निवेदन बुधवारी, २६ जून रोजी देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर रस्त्यावर आर डी सर्कलहून चुकीच्या दिशेने वाहने जातात, वारंवार अपघात होतात. यात जीवितहानी झाली आहे. नयनतारा इमारतीसमोरील दुभाजक हटवून बडदेनगर, जुने सिडकोकडे जाणारा रस्ता खुला करावा, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. दीड वर्षाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली. वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीने वृक्षतोडही करण्यात आली. यानंतरचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पडले आहे.
चुकीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हे काम पुन्हा सुरू करून त्वरित पूर्ण करावे, जुने सिडकोकडे जाण्यासाठी रस्ता खुला करावा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, विनोद पोळ, निलेश ठाकूर, मनोज वाणी, सतीश मणिआर, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, भारती देशमुख, वंदना पाटील, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील आदींनी केली आहे. महापालिका आयुक्त अशोक करंजकर, शहर अभियंता संजय अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले आहे.