नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात मतदानाच्या दिवशी पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आला. येथील बी.डी भालेकर मतदान केंद्राच्या बाहेर विलास बाळु नरवडे रा. पळसे हा पैसे वाटप करतांना पकडला गेला. त्याच्याकडून पोलिसांनी ६९ हजार ५०० रुपये जप्त केले असून भद्रकाली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
नरवडे हा मतदान केंद्राबाहेर मतदारांना पैशांचे पाकिटे वाटप करण्यात येत असल्याचे निदर्शना आले आहे. पैशाचे पाकीटं वाटप करणा-यास शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. या पाकिटांमध्ये ५०० च्या नोटा आणि मतदार स्लिप आढळून आल्या आहेत. दरम्यान पैशाची पाकिटं असणा-या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यातही घेतले. त्यानंतर गुन्हा दाखल केला. संबधित व्यक्ती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.
काल मनमाड व येवला येथे या घटना घडल्या आज नाशिकमध्ये पैसे वाटप करतांनाचा प्रकार समोर आला.