नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील शिंदे टोलनाका भागात चहाचे पैशावरुन झालेल्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषी पवार, बॉबी उर्फ ऋषीकेश अडसुरे, साहिल कोरडे (रा.तिघे चेहडी पंपीग,ना.रोड), शाहिद (रा.देवळालीगाव),घनंजय म्हस्के (रा. माणिकनगर) व गणेश उर्फ गणू रेवगडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अरबाज नजीर सय्यद (२३ रा.अरिंगळे मळा, सैलानी बाबा दर्गाजवळ एकलहरारोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. सय्यद सोमवारी (दि.२४) रात्री शिंदे टोलनाका भागात गेला असता ही घटना घडली.
बासूंदी हॉटेल नजीक असलेल्या चहाच्या टपरीवर संशयित पैसे देण्याच्या कारणातून गोंधळ घालत होते. यावेळी सय्यद याने टपरीवाल्याचे पैसे देवून टाकण्याचा सल्ला दिल्याने ही घटना घडली. परिचीत असलेल्या टोळक्याने शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत संशयित ऋषी पवार याने जीवे मारण्याच्या उद्देशाने सय्यद याच्या कानाजवळ कोयत्याने वार केला. सय्यद या हल्यात गंभीर जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.