नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फार्म हाऊसमधील स्विमींगपूल बांधकामात परप्रांतीय ठेकेदारासह त्याच्या कारागिराने एकास सात लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्धवट काम सोडून संशयितांनी पोबारा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण रूपलाल सुथारिया (रा.फतेहपूर,राजस्थान) व किसनलाल नारायणजी सुतार (रा.भुताला उदयपूर,राजस्थान) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत मनोज महादू निकम (रा.गुलमोहरनगर,म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांचा वरवंडीरोडवरील आळंदी कॅनलजवळ फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये गेल्या वर्षी स्विमींगपूल बांधकामाचे काम संशयितांनी घेतले होते.
यापोटी १९ लाख ७० हजाराची रोकड अदा करण्यात आली होती. या करारात खोदकाम,कॉक्रेटीकरण तसेच भिंती व पृष्ठभाग व आजूबाजूच्या भागाबरोबरच टाईल्स व फिल्टरच्या कामाचीही हमी घेण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात संशयितांनी सुमारे १२ लाख ७६ हजार १०० रूपये किमतीचेच काम केले. उर्वरीत काम अर्धवट सोडून संशयितानी पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.