निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे राहणाऱ्या सुजाता भूषण निश्चित या २७ वर्षीय नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या दीड वर्षीय बाळासह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी मयत सुजाता चे वडील रामकृष्ण गाजरे यांनी निफाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलीला सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदविली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी रामकृष्ण प्रभाकर गाजरे यांची मुलगी सुजाता हिचा विवाह 19 जून 2019 रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निचित यांच्याशी झालेला होता. मात्र विवाह नंतर सातत्याने सासरी तिचा छळ केला गेला. माहेरून पैसे आणावे, तसेच काम करत नाही, झोपून राहते अशा वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जायचा. या त्रासाला कंटाळून सुजाता हिने दिनांक 25 जून 2024 रोजी रात्री चे सुमारास त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये आपला दीड वर्षाचा मुलगा गुरु भूषण निचीत याच्यासह उडी मारून आत्महत्या केली. या शेततळ्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे चांदोरी तालुका निफाड येथून आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आलेले होते. या पथकातील स्वयंसेवक सागर गडाख बाळू आंबेकर सुरेश शेटे संतोष लगड आदींनी शेततळ्यामध्ये बुडालेल्या मायलेकाचे मृतदेह शोधून बाहेर काढले.
पोलिसांनी मयत सुजाताचा पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम आणि उपनिरीक्षक ईश्वर पाटील हे अधिक तपास करीत आहेत.