इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतात जुलै २०१५ ते जून २०१६ आणि ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत उत्पादन क्षेत्रातील १८ लाख असंघटित उद्योग बंद झाले आहेत. या कालावधीत या असंघटित उद्योगांमध्ये काम करणार्या ५४ लाख लोकांच्या नोकर्या गेल्या.
असंघटित क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तथ्य पत्रकाच्या तुलनात्मक विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान उत्पादन क्षेत्रात सुमारे १७८.२ लाख असंघटित युनिट कार्यरत होते. ते जुलै २०१५ ते जून २०१६ दरम्यान कार्यरत असलेल्या १९७ लाख असंघटित युनिटच्या तुलनेत सुमारे ९.३ टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे या आस्थापनांमध्ये काम करणार्या लोकांची संख्याही या कालावधीत सुमारे १५ टक्क्यांनी घटून ३.०६ कोटी झाली आहे. ती पूर्वी ३.६०४ कोटी होती. असंघटित क्षेत्रात अशा व्यवसायिक घटकांचा समावेश होतो, ज्या स्वतंत्र कायदेशीर संस्था म्हणून अंतर्भूत नसतात. या उपक्रमांमध्ये साधारणपणे लहान व्यवसाय, एकमेव मालकी, भागीदारी आणि अनौपचारिक क्षेत्रातील व्यवसायांचा समावेश होतो.
ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान १.१७ कोटी कामगार जोडले गेले आहेत, ज्यामुळे भारताच्या व्यापक अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांची संख्या १०.९६ कोटी झाली आहे, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीतील साथीच्या आजाराच्या तुलनेत ही संख्या अजूनही कमी आहे. सांख्यिकी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रणव सेन म्हणाले, की अनौपचारिक क्षेत्राचा समावेश असलेल्या असंघटित क्षेत्राला सततच्या आर्थिक धक्क्यांचा मोठा फटका बसला आहे. अशा धक्क्यांमध्ये, वस्तू आणि सेवा कर आणि कोविड महामारी हे प्रमुख आहेत. टाळेबंदीमुळे अनौपचारिक क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे यात शंका नाही. या क्षेत्रातील आस्थापनांमध्ये साधारणपणे २.५ ते ३ लोकांना रोजगार असतो. बहुतेक लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत किंवा त्यांच्यामध्ये कुटुंबातील सदस्य काम करतात. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील सुमारे ५४ लाख नोकर्या गेल्या आहेत.
श्रमिक अर्थशास्त्रज्ञ संतोष मेहरोत्रा म्हणतात. की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात आहेत आणि बिगर कृषी क्षेत्रानंतर सर्वात मोठे रोजगार प्रदाता आहेत. २०१६ नंतर, सततच्या धोरणात्मक धक्क्यांमुळे, असंघटित क्षेत्रातील या घटकांमधील एमएसएमई आणि बिगर कृषी रोजगाराच्या स्थितीत घट झाली आहे. तथापि, सध्याच्या आकडेवारीवरून असे दिसून येते, की साथीच्या रोगानंतर एकूण आस्थापनांची संख्या वाढली आहे. लोकांचे स्वतःचे उद्योग उघडण्याच्या वाढत्या संख्येमुळे ही संख्या वाढली आहे. मोठ्या लोकसंख्येच्या अस्तित्वासाठी ही एक रणनीती बनली आहे. साधारणपणे अशा आस्थापनांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची नियुक्ती केली जात नाही. त्यामुळेच रोजगार निर्मितीचा दर त्याच प्रमाणात वाढला नाही. आकडेवारीचे विश्लेषण हेदेखील दर्शविते, की ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत ट्रेडिंग क्षेत्रातील असंघटित आस्थापनांची संख्या २ टक्क्यांनी घटून २.२५ कोटी झाली आहे. जुलै २०१५ ते जून २०१६ या कालावधीत ती २.३०५ कोटी होती. मात्र, या काळात या क्षेत्रातील कामगारांची संख्या किरकोळ वाढून ३.८७ कोटींवरून ३.९० कोटी झाली आहे. दुसरीकडे, या कालावधीत इतर सेवा क्षेत्रातील असंघटित आस्थापनांची संख्या सुमारे १९ टक्क्यांनी वाढून २.४६४ कोटी झाली आहे. ती पूर्वी २.०६८ कोटी होती. त्याचबरोबर या क्षेत्रात काम करणार्या कामगारांची संख्या ३.६५ कोटींवरून ९.५ टक्क्यांनी वाढून ३.९९६ कोटी झाली आहे.