इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः सरकारी नोंदी निघालेल्या मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशा मागण्या करीत त्या पूर्ण झाल्या नाहीत, विधानसभेला गुलाल रुसेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणासाठी कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्याचा पुरावा मी द्यायला तयार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळाले पाहिजे. सगेसोयरेच्या अंलबजावणीची व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणे केली नाही, तर विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल. तुम्ही गुलालाचा अपमान करू नका. कोणाच्याही दबाबावाला बळी पडू नका. कुणबी म्हणून सरकारी नोंदी मुस्लिम समाजाच्या निघाल्या असल्याने मुस्लिमांनासुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे.
ज्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.