इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडीत स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या; परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे पवार यांनी म्हटले आहे. त्यांना खा. संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले, की पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे; पण सांगलीच्या जागी काँग्रेस, राष्ट्रवादीने काम केले नाही. त्यातच केंद्र सरकारने सर्वांत जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका बसला. पवार विधानसभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील, असा प्रश्न त्यांनी केला. राऊत यांनी पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे; परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट, थैल्या आणि खोक्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही. त्यासंदर्भात बैठक लांबणीवर पडली आहे. लवकरच बैठक ठरवू, असे ते म्हणाले. शिंदे यांनी नाशिक दौरा केला. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावण्यासाठी ते येतात. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नका, असे ते म्हणाले. हेलिकॉप्टरमधून वीस कोटी कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर, शिक्षकांना या बाजारात ओढू नका. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार होतो आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे पाहत आहे, अशी टीका खा. राऊत यांनी केली.
डमी उमेदवार पद्धत बंद करण्याची मागणी करून ते म्हणाले, की लोकांना भ्रमित केले जात आहे. यातून मार्ग काढावा लागेल. आदिवासी आणि शेतकरी चुकून शिवसेना समजून धनुष्यबाणाला मते देतो. त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते.