नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असतांना या निवडणुकीत वाढलेला राजकीय हस्तक्षेप व संस्था चालकांच्या उमेदवारीमुळे शिक्षकांमध्ये आता संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत पहिली पसंती शिक्षक उमेदवाराला देण्याचा अनेक शिक्षकांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीत वारे फिरले असून त्यामुळे दिग्गज उमेदवारांना धक्का बसू शकतो.
नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हयातील जवळपास ७० हजार शिक्षक या निवडणुकीत मतदान करणार आहे. पण, या निवडणुकीत पहिल्यांदा वाढलेला राजकीय हस्तक्षेपामुळे सर्व स्तरातून टीका होवू लागली आहे. अनेकांनी सोशल मीडिया व प्रत्यक्ष त्यावर जोरदार टीका केली आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी असलेल्या या मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीबरोबरच अनेक संस्था चालक निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे राज्यपातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
पण, मतदार असलेल्या शिक्षकांना हा हस्तक्षेप अजिबात आवडलेला नाही. त्यांच्यावर पहिल्यांदा राजकीय दबाव वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे अनेक आमिष दाखवले जात आहे. दारुच्या पार्ट्या, पाकीट व पैठणीची चर्चा गेल्या निवडणुकीत होती. ती यावेळी सुध्दा असल्यामुळे पालकांमध्ये सुध्दा संताप आहे. गेल्यावेळी पैठणीमुळे शिक्षकांची मोठी बदनामी झाली. त्यामुळे आता शिक्षक सावध झाले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी शिक्षक उमेदवाराला पहिली पसंती दिली आहे.