इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गाडीत बसलेले असतांना एक काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांचे चिखलात माखलेले पाय धुत असतांनाचा व्हिडिओ व्हायरला झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सोमवारी केली. अकोल्याच्या वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन नाना पटोलेंनी घेतले. या ठिकाणी पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता. चिखलातून वाट काढत नाना पटोले यांनी दर्शन घेतले. त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतले.
दरम्यान, कार्यकर्त्याने फक्त पाणी ओतले. आपणच पाय धुतले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर भाजपने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले खोटेपणात काँग्रेसचा हात कोणीच धरू शकत नाही. जनतेला गुलाम समजून वाट्टेल तशी वागणूक देणाऱ्या नानांच्या नाना कळा पहा…महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय चिखलात भिजले म्हणून त्यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावले कॉँग्रेसची ही सरंजामी वृत्ती त्यांच्या नसांनसांत भिणली आहे. यांच्या हातात सत्ता गेली तर गरिबांना दिवस ‘हालात’ काढावे लागतील.