इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत सोमवारी भाजपच्या केंद्रातील प्रमुख नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला राजीनामा व संघटनात्मक बदलबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष होते. पण, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुन्हा एकदा एनडीएचं महायुतीचं सरकार ताकदीने महाराष्ट्रात आणायचे यावर चर्चा झाली.
या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत झाली. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर येत्या विधानसभेचा रोडमॅप यावरही आम्ही प्राथमिक चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून आणता येईल, या संदर्भात आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत चर्चा करुन अत्यंत मजबुतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल यावर चर्चा झाली
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बीएल संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र विधानसभा भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पियूष गोयल, मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठकीला उपस्थित नव्हते.