इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एसटी महामंडळाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम एसटीने सुरु केली असून त्यामुळे शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सुचना महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. पण, मासिक पास काढतांना ब-याच अडचणी येत होत्या. आता त्या सोप्या होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. तेही आता शाळा – महाविद्यालयात मिळणार आहे. हे पास शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.
या संदर्भात १८ जून पासुन एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेतही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.