नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या काळात होत असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीनं (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंडियन पॅनोरमाचं आयोजन केलं जातं. इंडियन पॅनोरमाअंतर्गत आखलेल्या नियमांमध्ये नमूद अटी आणि कार्यपद्धतीनुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.
‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतातील सिनेजगतातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत केली जाते. यात फिचर फिल्म्ससाठी एकूण बारा सदस्य तर नॉन-फिचर फिल्म्ससाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात. हे सर्व ज्युरी, सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समिती चित्रपटांची निवड करतात. आपल्या वैयक्तिक ज्ञान कौशल्याचा वापर करून, ही नामवंत व्यक्तिमत्वांची निवड समिती एकसमान योगदान देत, एकमतानं चित्रपटांची निवड करते. त्यातूनच इंडिअन पॅनोरमा अंतर्गतच्या विविध वर्गवारीत सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते.