इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली असल्याचे सांगत माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकुर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत सरकारच्या जीआरची प्रतही यात जोडली आहे.
त्यात म्हटले आहे की, या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे…! रेशनवर बियर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतनार वाटतं सरकार… जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे. पिओ बियर….करो सरकार को चिअर
सरकारने हे परिपत्रक काढल्यानंतर सोशल मीडियातून यावर जोरदार कॅामेंट केले जात आहे. गेल्या काही दिवसापासून जीआरची ही प्रतही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात आता माजी मंत्री ठाकुर यांनी हा हल्लाबोल केला आहे.