इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चर्चा झाली. सरकारच्या वतीने सगेसोयऱ्याबाबत निर्णय घेण्याबाबत कुणी काय बोलायचे हे ठरले आहे. या प्रश्नातून आम्ही मार्ग काढू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जे.पी. नड्डा, अमित शाह यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार चार खासदार झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे मान्य करण्यात आले, असे सांगून अजितदादा म्हणाले, की आम्ही स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रिपद घ्यायला नकार दिला. काही दिवस थांबल्यानंतर आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवाबद्दल ते म्हणाले, की अल्पसंख्याक समाजात निर्माण झालेल्या भीतीमुळे महायुतीला फटका बसला. संविधान रद्द करण्याची भीती काहींनी निर्माण केली होती. ती कमी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. मराठा आरक्षणाचा फटका बसला. कापूस, दूध, सोयाबीन, कांदा आदींमुळे शेतकरी नाराज होते.
ज्या वेळी अपयश येते, त्या वेळी वेगवेगळे सल्ले दिले जातात. आमच्या प्रतिक्रियेचे चुकीचे अर्थ निघतात, असे ते म्हणाले.