इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एकाही नेत्याला मंत्रिपद दिले नाही. पूर्वी कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रफुल पटेल यांना राज्यमंत्री (स्वातंत्र्य कारभार) पदाची ऑफर होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी टीका केली आहे. त्यांना मंत्रिपद दिले नसले, तरी भाजपने ‘ईडी’चा ससेमिरा कमी करून त्यांना व्यक्तिगत फायदा करून दिला, अशी टीका आ. पवार यांनी केली आहे.
लोकसभेत एक खासदार निवडून आल्यानंतर अजितदादांनी केंद्रात दोन मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा व्य्कत केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना एकाच राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली; परंतु ती ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. यावर आ. पवार यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की जे नेते शरद पवार यांना सोडून भाजपसोबत गेले, त्यांना व्यक्तिगतरित्या खूप काही मिळाले आहे. पटेल यांचे घर आणि ऑफिस जप्त केले होते. आता ती कारवाई थांबवून घर आणि ऑफिस त्यांना परत केले; पण मंत्रिपद दिले नसल्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
आ. पवार म्हणाले, की भाजप लोकसभा निवडणुकीपुरताच अजितदादांचा वापर करून आहेत असे आम्ही वारंवार म्हणत होतो. मात्र या निवडणुकीत भाजपला त्यांचा काहीच फायदा झालेला नाही. आता विधानसभा लढवायाची असेल, तर अजितदादा आणि त्यांच्या आमदारांपुढे कमळाच्या चिन्हाचा हा एकच पर्याय असेल, असा केंद्रीय भाजपच्या नेत्यांनी संदेश दिला आहे. राज्यमंत्रिपद दिल्यानंतर फडणवीस यांनीच अजितदादा, पटेल आणि सुनील तटकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपला काहीही फरक पडत नाही. शेवटी त्यांना सर्व रिपोर्ट दिल्लीलाच पाठवावे लागतात. ‘ईडी’च्या कारवाया थांबवल्या आहेत. आता राहिलेल्या कारवायातूनही तुमची मुक्तता करण्याचा समझोता झालेला असेल, अशी शंका आ. पवार यांनी व्यक्त केली.