इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : शेअर मार्केट म्हणजे क्षणाक्षणाला उलथापालथ हे ठरलेले आहे. कधी मार्केट उसळी मारतो तर कधी एकदम खाली पडतो. अशातच मागील आठवड्यात भारतीय बाजार घसरल्याने नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित भांडवलमूल्य तीन लाख दहा हजार ९५८.०१ कोटींनी कमी झाले. कागदोपत्री गुंतवणूकदारांचे तीन लाख दहा हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
परकीय वित्त संस्थांकडून होत असलेली विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे वाढत असलेले दर यामुळे बाजारावर निराशेचे ढग दाटले असून, त्याचे पडसाद आगामी सप्ताहात उमटू शकतात. गत सप्ताहात बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले. पर्यायाने स्मॉल कॅपचा अपवाद वगळता अन्य सर्व महत्त्वाचे निर्देशांक खाली आले. सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावरील विक्री बाजाराला खाली आणत आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी सातत्यपूर्ण खरेदी करून बाजार खाली येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, तरी ते कमी पडले. आगामी सप्ताहात सुमारे अडीचशे कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यांच्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे.
युद्धामुळे वित्तसंस्थांचा सावध पवित्रा
अमेरिकेमधील बाँडचे व्याजदर पाच टक्क्यांवर गेले आहेत. येत्या काळात त्यात वाढीची शक्यता आहे. जगावर युद्धाचे ढग असल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी सावध पवित्रा घेत गुंतवणूक काढण्याचे धोरण कायम ठेवले. गुंतवणूक काढून ती अमेरिकेत गुंतवण्यात संस्था गुंतल्या आहेत. परकीय वित्तसंस्थांनी भारतातून २७९९.०८ कोटी रुपये काढले. देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३५१०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.