नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचारी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते यापैकी ५८ कर्मचारी हे उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा निकाल ३७ टक्के लागला आहे.
२५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये १) महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामंचायत सामान्य प्रशासन २)महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ व इतर जिल्हा परिषद नियम ३) महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम व शिस्त व अपील नियम, जिल्हा परिषदेकडील योजना या तीन विषयांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयात ४० गुण मिळवणे आवश्यक आहे, याप्रमाणे ५८ कर्मचारी हे परीक्षा उत्तीर्ण झाले.
जिल्हा परिषद कर्मचारी सेवेत दाखल झाल्यानंतर ४ वर्षात ३ संधीमध्ये सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, विहित मुदतीत सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व वेतनवाढी उत्तीर्ण होईपर्यंत रोखल्या जातात, त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण होणे कर्मचाऱ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असते. सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील वेतनवाढ, स्थायित्व प्रमाणपत्र व पदोन्नतीचे लाभ दिले जातात.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश निर्गमित केले असून सदर परीक्षेचा निकाल सर्व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देणे बाबत व उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात ३१ ऑक्टोबर २०२३ याबाबतची नोंद घेण्याचे आदेशित केले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.