इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भोपाळः मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पिपलोडी गावात रविवारी रात्री उशिरा लग्नाच्या वऱ्हाडाची ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून चार मुलांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १५ जण जखमी झाले आहेत.
राजगडचे जिल्हा दंडाधिकारी हर्ष दीक्षित यांनी सांगितले, की जखमींपैकी १३ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच वेळी डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने दोघांना उपचारासाठी भोपाळला पाठवण्यात आले आहे. शेजारच्या राजस्थान राज्यातील मोतीपुरा गावातून लग्नाची मिरवणूक आली होती आणि ती येथील कुलमपूरला जात होती. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आदेशानुसार जखमींवर योग्य उपचार केले जात आहेत आणि शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
राजस्थानमधील इकलेराजवळील मोतीपुरा गावातील तातुडिया कुटुंबाची लग्नाचे वऱ्हाड ट्रॅक्टरमधून राजगढजवळील देहरिनाथ पंचायतीच्या कमलपूर गावात येत होते. खामखेडापासून काही अंतरावर असलेल्या पिपलोडी वळणावर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पडला आणि पलटी झाला. यादव यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक राजगड घटनास्थळी उपस्थित आहेत. दिग्विजय सिंह यांनी राजगड दुर्घटनेवर चिंता व्यक्त केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला.