इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत ४५ तास ध्यान केले. त्यांनी केलेल्या ध्यानामुळे किमान ८०० जागा मिळाल्या पाहिजे तरच ते ध्यान मार्गी लागले असे सांगत त्यांनी एक्झिट पोलची खिल्ली उडवली. ते म्हणाले ओपनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षांत चुकीचे ठरत आहेत. भाजप देशाचे गृह मंत्रालय आणि यंत्रणा राबवून ते करुन घेत असल्यचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की, एक्झिट पोलचे आकडे ठरवून दिलेले आहेत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत परंतु एका एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाला ३३ जागा मिळतील, असे दाखवले आहे. यामुळे एक्झिटपोल वाले भारतीय जनता पक्षाला ८०० ते ९०० जागा देतील, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. एक्झिटपोल अत्यंत फ्रॉड आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचे सरकार देशात येणार आहे. इंडिया आघाडीला २९५ ते ३१० जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला. लोकांकडून मिळालेला हा कौल असल्याची पुष्ठीही त्यांनी जोडली. सध्या मोठे मोठे जे पक्ष आहेत, जे सत्तेवरती आहेत, ते पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. गेल्या दहा वर्षातील एग्झिट पोल म्हणजे ‘पैसा फेको, तमाशा देखो’ असा आहे. यामुळे आमचा त्यावर विश्वास नाही. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ पेक्षा जास्त जागा मिळेतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी विजयी होतील. शिवसेनेचा १८ चा आकडा कायम राहील तसेच काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स होणार आहे. देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.