.
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पोर्शे कार अपघात प्रकरणाने इथल्या गृह, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य & वैद्यकीय खात्यातील भोंगळ कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. नेहमीप्रमाणे याची जबाबदारी न स्वीकारता शंभूराज देसाई अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस मला पाठवत आहेत…बूंदसे गई सो हौद से नही आती है !! असे सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, पॉर्शे कार अपघाताच्या निमित्ताने गृह, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य किंवा वैद्यकीय खात्याची जी सगळी अब्रू चव्हाट्यावर आलीय ती आधी सांभाळा… आणि मग दावे ठोकण्याची भाषा करा. लोकशाहीमध्ये विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देणं सत्ताधाऱ्यांना बांधील असतं याचं भान असू द्या…
पुणे ‘ड्रंक ॲड ड्राईव्ह’ प्रकरणात सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडणारे आ. रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी पुणे उत्पादन शुल्क विभागावर आणि या खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारत दरमहा पुण्यातून कुणाला किती हप्ता मिळतो, याचे आकडे जाहीर केले होते. उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांनी रेटकार्ड वाचून दाखवले होते. त्यासंदर्भात उत्तर द्या, काय कारवाई करणार असा जाब विचारला होता. त्यानंतर देसाई यांनी नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते. त्यावर अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.