पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड येथील चारधाम यात्रा-२०२४ साठी यात्रेकरुंच्या संख्येत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरुंसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून नोंदणी अनिवार्य असल्याचे उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी कळविले आहे.
चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या आठवड्यात यात्रेकरुंची प्रचंड गर्दी झाल्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने धाम येथील दर्शनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी शासनाने उत्तराखंडने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या तारखेसाठी संबंधित धामांच्या ठिकाणी दर्शनाची नोंदणी केली असेल त्या तारखेलाच दर्शनाची परवानगी असेल.
वृद्ध आणि अगोदरपासूनच वैद्यकीय स्थिती अस्तित्वात असलेल्या भाविकांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तसेच उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या लिंकवरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही उत्तराखंड प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.