इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाता प्रकरणात ससून रुग्णालय चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. मुलाचे बदललेले रक्त नमुने त्याची आई शिवानी अग्रवालचे आहेत का, याचा तपास सुरू असताना ती दोन दिवसांपासून फरार असल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४० आणि डॉ. तावरे यांच्या कार्यालयाचा पंचनामा करून ते सील करण्यात आले आहे.
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवालने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्याशी तब्बल ५० लाख रुपयांचे डील झाल्याचे बोलले जात आहे. मुलाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकण्यासाठी शिपाई अतुल घाटकांबळे यास ५० हजार रुपये, तर डॉ. हळनोर यास अडीच लाख रुपये दिले गेले.
दरम्यान, प्रकरण शेकताच ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, या प्रकरणातील दोन डॉक्टर आणि शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. तिथे रक्ताचे नमुने घेताना तीन अनोळखी व्यक्ती दिसल्या आहेत.