निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर शेततळ्यात बुडून प्रेम गोपाळ ढेपले (१५) आणि त्याचा लहान भाऊ प्रतिक गोपाळ ढेपले (१३) या दोघांचा घराजवळील दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती. मात्र अर्धा तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी त्यांना शोधण्या करता गेली. जवळपास शोध घेतला असता जवळच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले. मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र शेततळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांचा जीव वाचवण्याची संधी मिळू शकली नाही.
प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळत उतरला असावा मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेचे वृत्त समजतात परिसरात एकच खळबळ उडाली. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.