इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्तास रांगेत ताटकळत ठेवले आहे. शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहे. रांगेत लागून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण प्रश्न वर्षभराच्या जगण्याचा असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे कारण पुढे करून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहे. दहा-वीस एकराचा शेतकरी या दोन पाकीट बियाण्यांमध्ये पेरणी कशी करणार? सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.
शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची पुरती कल्पना असल्याने आता पोलिस संरक्षणात बियाणे विक्री केली जात आहे. कंपनीने आता अधिकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. म्हणून दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे.