इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना केलेल्या फोनप्रकरणी आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर देताना अजितदादा पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन केल्याचे मान्य केले. धनिक पुत्राकडून अपघात झाल्याने प्रकरण दडपण्यासाठी दबाव येईल. कुणाचाही दबाब मान्य करू नका, असे त्यांना सांगितल्याचे अजितदादा म्हणाले. त्यानंतर पुन्हा अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा व फोन जप्त करा अशी मागणी केली आहे.
पोर्शे कार अपघातानंतर पवार यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन लावल्याचा आरोप दमानिया यांनी केल्यानंतर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देतांना पोलिस आयुक्तांना फोन केल्याची कबुली दिली. ते म्हणाले, की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अशा प्रकरणांत फोन येत असतात. मी पोलिस आयुक्तांना फोन करून सांगितले, की मुलगा श्रीमंत कुटुंबातील असल्यामुळे पोलिसांवर दबावाची शक्यता आहे. कितीही दबाव टाकला, तरी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, असे पोलिस आयुक्तांना सांगितले होते.
या प्रकरणातील आरोपीच्या पालकांनी आपल्या मुलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अल्पवयीन मुलाचे वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. सध्या मुलगा निरीक्षण गृहात असून त्याचे वडील आणि आजोबांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.
आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या कथित हस्तक्षेपाविषयी विचारणा करताच अजितदादा म्हणाले, की टिंगरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पुण्यात माझी भेट घेऊन आपली बाजू मांडली. तपासात हलगर्जी करणाऱ्या दोषी पोलिसांसह डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.