इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे: कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या धनिकाच्या दिवट्याच्या रक्त नमुन्याची अदलाबदल केली. ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे समजते.
पोलिसांकडून कोणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ससूनच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. पोलिस त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पोर्शे कार अपघातानंतरचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिस बारकाईने पाहून रक्तचाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करतील. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. जे कर्मचारी चौकशीला येणार नाहीत, त्यांना जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसआयटी’ समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी ससूनमध्ये येऊन ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कार्यपद्धतीची माहिती घेतली. ससूनच्या डॉक्टरांनी धनिकपुत्राच्या रक्त नमुन्याची अदलाबदल कशी केली, याविषयीचा अहवाल डॉ. सापळे सादर करणार आहे.