नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळयाा भागात सोमवारी (दि.२७) झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. भरधाव अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत ३८ वर्षीय व्यक्तीसह ७५ वर्षीय वृध्देला आपला प्राण गमवावा लागला. याप्रकरणी उपनगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जितू अनिल परदेशी (३८ रा.आगर टाकळी,उपनगर) हा सोमवारी रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने एका रिक्षाचालकाने त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पोलीस शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. या अपघातात रजनी अंबादास सोनवणे (७५ रा. पेठ गल्ली, गंगापूरगाव) यांचा मृत्यू झाला. रजनी सोनवणे या रस्त्याने पायी जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. मुलगा विजय सोनवणे यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना डॉ. राहूल येवले यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ. प्रियंका मोहोळकर यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.