इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यात अनेक ठिकाणी जातीचे राजकारण झाले. त्याचा वणवा अजून थांबायचे नाव घेईना. अशाच दोन जातीत तेढ उत्पन्न करणार्या जातपंचायतीवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नुकतीच समाजमाध्यमात एक चित्रफीत फिरताना आढळून आली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्य़ातील एका गावात वंजारी समाजाची जातपंचायतीत एक फतवा काढण्यात आला आहे. त्यामध्ये कुणी समाजबांधवाने मराठा समाजातील दुकानातून खरेदी केल्यास त्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गावच्या हरिनाम सप्ताहात कुणी मराठा जातीचे महाराज बोलवायचे नाही. मराठा जातीच्या हॅाटेलात जेवायचे नाही. असे कुणी केल्यास त्याच्या कार्यात कुणी समाजबांधव सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. संबधित जात पंचायतचे हे कृत्य महाराष्ट्र शासनाने २०१७ साली पारीत केलेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे उल्लंघन आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार अशा जातपंचायतवर स्वतः होऊन गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आधिकार दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित जातपंचायतवर गुन्हा दाखल करुन दोन समाजातील तेढ थांबवावी. व सौहार्दपूर्ण वातावरण तयार होईल, यासाठी प्रयत्न करावेत.